राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
रमजान कराडे - वेदगंगा वार्ता नानीबाई चिखली ता. 15
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व झारखंड विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.राज्यात एका टप्प्यात सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. तर सर्व जागांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक तारखांची घोषणा केली.
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करण्यासोबत आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचीही घोषणा केली. यामुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
अधिसूचना जारी : 22 ऑक्टोबर
अर्ज भरणे शेवटचा दिवस : 29 ऑक्टोबर
अर्जांची छाननी : 30 ऑक्टोबर
अर्ज माघारी : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर
मतमोजणी : 23 नोव्हेंबर
सध्याच्या महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. गतवेळी सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता सुरू होऊन ऑक्टोबर महिन्यात मतदान झाले होते. त्यामुळे यावेळी नेमकी आचारसंहिता कधी सुरू होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते.