पन्हाळ गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
![]() |
नानीबाई चिखली : येथील शिव-शाहू मराठा भवनचे उद्घाटन करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ. सोबत जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रवीण भोसले व इतर मान्यवर. ( फोटो जमीर, चिखली ) |
वेदगंगा वार्ता नानीबाई चिखली ता. 13
पन्हाळा गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नाही. पालकमंत्री झालेनंतर पन्हाळ्यावर गेल्यानंतर हे लक्षात येताच सर्वप्रथम गडावर पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा निश्चय केला. त्या कामाला प्रत्यक्ष सुरवात लवकरच होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
येथे शिव शाहू मराठा भवन, हालसिध्दनाथ मंदिर येथे ओपन शेड, पंचशील नगर येथे स्वागत कमान आदी विकासकामांच्या उद्घाटन व शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. शिवशाहू मंडळाचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे माजी सभापती अरूण भोसले, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सदाशिव तुकान, सरपंच युवराज कुंभार उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, गेल्या ३० वर्षांत तालुक्यामध्ये सर्व प्रकारचा विकास केला आहे. रस्ते, गटारी, मंदिरे, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक भवन आदी कामे केली आहेत. भैय्या माने म्हणाले, 'कागल तालुक्यात जी मोजकी गावे आहेत त्यातील चिखली हे गाव आहे, जेथे बारा बलुतेदार पहायला मिळतात. या घटकातील लोकांच्या भावनांचा आदर करीत त्यांना ताकद देत त्यांचे योग्य प्रकारे समाधान करण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने सर्वांचे पालकमंत्री झाले आहेत.
बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अजित भोसले, उपसरपंच कुमार संकपाळ, माजी सरपंच व सदस्य अल्लाबक्ष सय्यद, बाळासाहेब काटकर, बापूसो पोवार, आण्णासो वडगुले, श्रीशैल नुल्ले, साधना जाधव, शिवशाहू मंडळाचे संचालक मंडळ आदी उपस्थित होते. विवेक गवळी यांनी आभार मानले.
म्हणूनच गावा-गावात मंदिरांची उभारणी... या विश्वरुपी ब्रम्हांडात एक अदृश्य शक्ती काम करत आहे. यावर आपला विश्वास आहे. परमेश्वराची भिती आहे. म्हणून माणूस सत्कर्म करत आहे. भिती नसती तर माणूस राक्षस बनला असता. माणसाने सुखी, समाधानी रहावे, यासाठीच आपल्या मतदारसंघात ७०० हून अधिक मंदिरांची उभारणी केली असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.