गाव माझा - नानीबाई चिखली

एकता, माणूसकी जपणारे नानीबाई चिखली


नानीबाईचा वाडा

रमजान कराडे - वेदगंगा वार्ता

हिंदू - मुस्लिमांचे आराध्य दैवत गैबी पीर यांच्या आशीर्वादाने पुण्यवंत झालेल्या, माता वेदगंगेने सुजलाम् सुफलाम् बनलेल्या व हुतात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले संस्थानिक नानीबाई चिखली हे माझं गाव. खरतरं नानीबाई चिखली म्हटले की डोळ्यासमोर येतो तो नानीबाईचा वाडा, गावच्या मध्यभागी असणारा तलाव, हुतात्मा स्मारक, वेदगंगा, चिकोत्रा नदीचा पवित्र संगम, संरक्षण करणारा गडदू, पारकट्टा सोबतच गावातील असणारी जिंदादिल माणसं. 

अशा या गावच्या उत्तरेला वाहणारी वेदगंगा व पुर्वेला वाहणारी चिकोत्रा नदी यांच्या बारमाही वाहणाऱ्या पाण्याने हिरव्यागार वनराईने नटलेलं हे चिमुकलं गाव. साधारण 180 वर्षांपूर्वी संस्थानिक असलेल्या नानीबाई नावाची एक पराक्रम स्त्री होऊन गेली. तिच्या नावावरून गावाला नानीबाई चिखली हे नाव मिळाले. या घटनेची साक्ष देणारा 'नानीबाईचा वाडा' आजही डौलाने उभा आहे. एकूण 1240 कुटुंबसंख्या, 1760 घरे, नऊ वसाहती, 51 गल्या, 24 तरुण मंडळे, सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरती विस्तारलेला गाव. कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध अंगांनी नटलेलं कागल तालुक्यातील नानीबाई चिखली हे सधन गाव. 

गावच्या मध्यभागातून जाणारा मुख्य रस्ता, जो कोल्हापुरातील राजारामपुरीची आठवण करून देतो. गावच्या मध्यभागी असणारा चौक, चौकात असणारा पारकट्टा, चौकाला लागून असणारा तलाव जो 'मिनी रंकाळा' या नावाने ओळखला जातो. गावच्या दक्षिणेला असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र. गारगोटी येथील खजिना लुटीत शहीद झालेले क्रांतिवीर मल्लू चौगुले तसेच त्यांचे जिवाभावाचे सहकारी व सिदनाळ बेनाडीच्या माळावर धारातीर्थी पडलेले हरिबा बेनाडे याच मातीतले. त्यांच्या बलिदानामुळेच क्रांतिवीराचे गाव म्हणूनही गावाला ओळखतात. त्यांच्या स्मृती सतत जागृत ठेवत असलेले स्मारक. शिवाय देशसेवेची असीम त्यागाची परंपरा लष्करात असलेल्या अंदाजे दीडशे आजी माजी जवानांनी आजही अखंड जपलेली आहे. 

नानीबाई चिखलीतील मिनी रंकाळा


गावात चार पतसंस्था, दोन सोसायटी, नऊ दूध संस्था आहेत. जिल्ह्यात एक नंबरला असलेली तसेच दररोज तीन हजार लिटर दूध संकलन करणारी शेतकरी दूध संस्थेची दुमजली इमारत तर सर्वांचे लक्ष वेधून घेते. सोमवार व शुक्रवार असा दोन दिवस आठवड्याचा बाजार गावात भरविला जातो. शैक्षणिक दृष्ट्या विचार करता गावात आठ अंगणवाड्या, एक कन्या शाळा, एक कुमार शाळा व एक हायस्कूल आहे.

वेदगंगेत असणाऱ्या बारमाही पाण्यामुळे वैयक्तिक तसेच संस्थांनी पाणीपुरवठा करून आज सर्व परिसर हिरवागार करून टाकला आहे. या पाण्यावरच अनेक दुबार, तिबार पिके घेतली जातात. तरीसुद्धा अलीकडे ऊस हे येथील महत्वाचे पिक आहे. गावात अनेक प्रकारच्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्यातील एकता, प्रेम, जिव्हाळा या गोष्टी दृष्ट लागण्यासारख्या पहायला मिळतात. गावात अनेक प्रकारची सुमारे पंधरा मंदिर आहेत. दर पंधरा दिवसाला एखादा तरी येथे सण, उत्सव असतोच. गैबी पीर उरूस, लक्ष्मीची यात्रा, हलसिध्दनाथ यात्रा, मोहरम अशा प्रकारचे मुख्य उत्सव. सण, उत्सवासाठी गावकऱ्यांचा एकच अलिखित नियम तो म्हणजे सण, उत्सव कोणत्याही धर्माचा असो त्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावयाचा. 

अशा या गावात राजकारण सुद्धा नसानसात भिणलेले. निवडणुका जवळ आल्या की इथे प्रत्येकाच्या अंगात राजकारण संचारते. पूर्वीपासून चालत आलेले दोन गट. आज याच दोनाचे चार गट झालेत. पक्षापेक्षा गटाला महत्व देणारी इथली माणसं. या कारणाने गाव विकासापासून वंचित होते. मात्र आज चित्र बदललेले आहे. गावाने विकासाची गती घेतली आहे. आज गावात कोठ्यावधी रुपयांची विकासकामे होत आहेत. आज गाव स्वच्छ, सुंदर झालेले आहे. येणारा प्रत्येक जण गावच्या प्रेमात कधी पडतो हे त्यालाही समजतं नाही. ग्रामस्वच्छता अभियानात गावाने भाग घेत यापुर्वी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. सर्वांना एकत्र घेऊन जाणारे, विविधतेतून एकात्मतेचे दर्शन घडविणारे तसेच जिंदादिल माणसाचं चिमुकलं, माझं गाव नानीबाई चिखली. 


1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक