भीमा मुरगूडे यांच्या राहत्या घरी वीज कोसळली
![]() |
भीमा मुरगूडे यांच्या घरी वीज कोसळल्यानंतर चौकटीची झालेली अवस्था |
येथील पंचशील नगरात मुरगूडे वस्तीत राहत असलेल्या भीमा मुरगूडे यांच्या राहत्या घरी तिसऱ्या मजल्यावर वीज कोसळली. सुदैवाने यावेळी या मजल्यावर कोणीही नसलेने जिवितहानी टळली. मात्र यामध्ये त्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेले काही दिवस नानीबाई चिखली परिसराला परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. विजेच्या कडकडासह दुपारनंतर येत असलेल्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सायंकाळी 6 वाजता विजांच्या कडकडाटासह आलेला हा पाऊस सुमारे तीन तास कोसळत होता. याच पावसात रात्री साडे आठच्या दरम्यान मुरगूडे वस्ती येथे राहत असलेल्या भीमा मुरगूडे यांच्या राहत्या घरी तिसऱ्या मजल्यावर वीज कोसळली.
सुदैवाने यावेळी येथे कोणीही नव्हते. मात्र यामध्ये पाण्याची टाकी, चौकट, पत्रे फुटले असून वायरिंग पूर्णपणे जळाले आहे. यातून त्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच सरपंच युवराज कुंभार, सदस्य विजय घस्ती यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अनिल घाटगे, विशाल चिखलीकर उपस्थित होते.