" कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे "
वेदगंगा वार्ता नानीबाई चिखली ता. 17
आज पाय उंबरठ्यावरच जड झाले, उंबरठा ओलांडताच येईना, कारण आतून फक्त हंबरडाच ऐकू येऊ लागला. मन सुन्न आणि बधीर झालं .
जी मैत्रीण आल्याबरोबर हसतमुखाने स्वागत करायला उभी असायची, आज मी तिच्या हार घातलेल्या फोटो समोर उभी होते. कितीही मनाला समजावलं तरी विश्वासच बसत नाही, जी नेहमी मॅडम मी तुमच्या सोबतच गाडीत बसणार म्हणून हट्ट करायची ती अशी न सांगताच सोबत सोडून जाऊच कशी शकते, का ? अश्विनीताई का ? फक्त एकदा साद घालायची होती, फक्त एकदा मन मोकळं करायचं होतं. आपला 'लेडीज ' ग्रुप नेहमी तुमच्या सोबत होता. आज बाकी हा ग्रुप बांधून ठेवणारी एक कडी न सांगताच
न कळत कधी गळून गेली कळलच नाही.
अश्विनीताई काय बोलू तुमच्याबद्दल आज शब्द सुद्धा मुके झाले, लेखनी थरथरायला लागली. पण आठवणीने मन भरून वाहू लागले. तुमच्यासोबत केलेली कोकण सहल, देवबाग, नेवते बीचवर बसून रात्री बारा एक पर्यंत मारलेल्या गप्पा, देवबाग बीचवर केलेली मज्जा, सुधाकर भाऊजी व तुमची केलेली गोड प्रेमळ चेष्टा, काढलेले फोटो, यशवर व सृष्टीवर तुमचे असलेले नितांत प्रेम, काळजी, तुम्हा दोघानां पाहिल्यावर नेहमी वाटायचं 'जोडी नंबर वन 'असं हसर, आनंदी, आदर्श कुटुंब, याचा आम्हा सर्वांनाच हेवा वाटायचा. आपली भुदरगडची सहल, आणि तुमच्या हातच्या बेसनाच्या लाडवाची चव, काजू पनीर कुरम्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. वंदना सोबत केलेला दंगा, मज्जा, मस्ती, तुमचे हास्य, तुमचा आवाज, अजूनही प्रत्येकाच्या कानात आणि मनामनात घुमत आहे.
एखादी लाट यावी आणि सारं काही क्षणात विखरून जावं तसं काहीसं झालं. आख्ख कुटुंब विखरून पडलं ज्या सुधाकर भाऊजींच्या चेहऱ्यावर नेहमीच तुमच्या अभिमानाचे हास्य आणि समाधान असायचं, आज तर त्यांच्याकडे पहावत सुद्धा नाही. भाऊजी म्हणून मारलेल्या हाकेच उत्तर तुडुंब भरलेल्या अश्रूतूनच मिळालं. त्यांचं सांत्वन करणारे शब्द कुठून आणू. त्यांच्या आयुष्यातून तुम्ही जाण्यान आलेलं रीतपण कशानच भरून निघू शकत नाही. घरट्यातली दोन्ही पाखर , यश -सृष्टी अबोलच झालीत. आईच्या मायेची ऊब, हक्काची प्रेमाची कुस, मुलं शोधत आहेत. का मुलांचा आनंद हिरावून घेतला नियतीने .
तुमच्या कुटुंबात, आम्हा सर्वांना, तुम्ही हव्या होतात .
" कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे " ........
तुमची मैत्रीण
सौ. प्रा. कृष्णामाई कुंभार ( हमीदवाडा )