नानीबाई चिखलीतील तालीम संस्कृतीला घरघर

नानीबाई चिखलीतील तालीम संस्कृतीला घरघर


रमजान कराडे - वेदगंगा वार्ता                                  नानीबाई चिखली ता. 26

एकेकाळी येथे असलेल्या तालमीतून अनेक मल्ल घडले. या मल्लांनी परिसरातील अनेक मैदाने गाजवली होती. काही मल्लांनी तर तालमीतून शरीरसंपदा कमवत स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेत हौतात्म्यही पत्करले. त्यामुळेच गावचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. मात्र,त्यांची हीच परंपरा नंतरच्या काळात पाहायला मिळाली नाही. कारण बदलत्या काळात तालमींना घरघर लागल्याचे पाहायला मिळाले. आता इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा तालीम नव्याने उभी करण्यासाठी काही हात झटत आहेत. त्यांना गरज आहे ती ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांच्या पाठबळाची. 

कोल्हापूर जिल्ह्याला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाते. राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीस प्रोत्साहन दिल्याने शहरासोबत ग्रामीण भागातही तालमींनी त्या काळात जोर धरलेला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात येथील चौगुले गल्ली व तुकान गल्ली येथे त्यावेळी दोन तालमी होत्या. तालमीतील आखाड्यामध्ये दररोज सकाळ, संध्याकाळ जोर, बैठका, सूर्यनमस्कार तसेच शड्डू घुमायचे. पीळदार शरीराबरोबरच तालमीतील वस्तादांकडून घीसा, एकलंगी डावांचे धडे येथील मल्ल त्यावेळी गिरवत असत. त्यांनी घेतलेल्या धड्यातूनच परिसरातील जत्रा, यात्रा तसेच कोल्हापूर, बेळगाव, सांगली भागातील मोठ मोठ्या कुस्त्यांचे फड जिंकत गावचे नाव अजरामर केले होते. 

परंतु बदलत्या काळात येथील तालमी नाहीशा झाल्या. सोबत मैदान गाजवलेले मल्ल देखील पडद्याआड गेले. त्यांच्यानंतर तालमीची परंपरा राखण्यासाठी काही जणांनी पुढाकार घेत देवर्षी मळ्यात तालीम सुरू केली. काही वर्षे चालल्यानंतर ती बंद पडली. दोन वर्षांपूर्वी पाण्याच्या टाकीजवळील पडक्या घरात काही तरुणांनी तालीम सुरू केली. त्यासाठी स्वखर्चातून त्यांनी घराचे छत बदलले, शेणामातीने भिंती सारवत आखाड्यासाठी आवश्यक लाल माती आणली. त्यामुळे तालमीत दररोज पंधरा, वीस मुले सराव करू लागली होती. 

मात्र मूळ मालकाने घर ताब्यात घेतल्याने तरुणांचे तालमीचे स्वप्न अपुरे राहिले. आता पुन्हा एकदा तालमीसाठी जोर धरला जावू लागला आहे. त्यासाठी काही हात झटत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ मिळाल्यास तालमीची खंडीत झालेली परंपरा नव्याने सुरू होईल व शड्डूचे आवाज घुमू लागतील. 

चौगुले गल्लीत असलेल्या तालमीत हरीबा बेनाडे, मल्लू चौगुले, आप्पासो मगदूम, राऊ परीट, गोपाळ देवर्षी, भीमा मुरगूडे, भाऊसो चौगुले, भीमा नुल्ले, आप्पासो कुंभार आदी स्वातंत्र्य वीरांनी तर नंतर हसन सय्यद, नाना चव्हाण यांनी कुस्तीत नाव कमावले. यातील हरीबा बेनाडे, मल्लू चौगुले यांनी तर स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेत हौतात्म्य पत्करले. त्यांच्या बलिदानामुळेच गावला क्रांतिकारकांचे नाव म्हणून ओळखले जात आहे. 

गावात कुस्तीची एक परंपरा आहे. परंतु अलीकडे ही परंपरा खंडित झाली आहे. आम्ही आता पुढाकार घेत तालमीसाठी जागा शोधत आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जागा उपलब्ध झालेस लोकवर्गणीतून आम्ही सुंदर अशी तालीम उभा करू. यासाठी नामवंत अशा कुस्तीपट्टूंशी चर्चा केली आहे.               - अरूण देवर्षी, गोपाळ चव्हाण ( कुस्तीप्रेमी ग्रामस्थ चिखली ) 


1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक