![]() |
फोटो -बस्तवडे -आणूर पुलावरील उत्तर बाजूस रस्त्यावर आलेले पाणी |
रमजान कराडे - वेदगंगा वार्ता
नानीबाई चिखली ता. 28
पुलाची मागणी ना शेतकऱ्यांची, ग्रामस्थांची ना परिसरातील ग्रामपंचायतींची. तरीसुद्धा शासनाने वेदगंगेवरती बस्तवडे आणूर दरम्यान पुलाची उभारणी केली. मात्र उभारणी पासून अनेक अडचणींचा सामना केलेल्या पुलामुळे जितक्या सोयी अनुभवल्या तितक्या गैरसोयी देखील. यामध्ये पुलाच्या दोन्ही बाजूकडील भरावामुळे पाण्याला आलेला फुगवटा, हजारो हेक्टर पाण्याखाली गेलेली शेती अनेक कुटुंबीयांना करावे लागलेले स्थलांतर. पुलावर पाणी येणार नाही म्हणून केलेला चुकीचा दावा मात्र उत्तर बाजूस रस्त्यावर आलेल्या पाण्याने पाच दिवस बंद असलेली वाहतूक. त्यामुळे शासनाने आतातरी बोध घेत भराव हटवत पिलर उभे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
राष्ट्रीय महामार्गाला समांतर तसेच महाराष्ट्र हद्दीतून जाणारा हा मार्ग. कागल, केनवडे फाटा, बस्तवडे, हमीदवाडा, कापशी पुढे गडहिंग्लज, आजरा, चंदगडला जाण्यासाठी मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अलीकडे मार्गावरील वाढलेल्या वाहतूकीचा परिणाम बस्तवडे येथील जून्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावर होतो. शिवाय बंधारा महापूर काळात पाण्याखाली जात असलेने शासनानेच पुढाकार घेत सोयीसाठी पुलाची उभारणी केली. यासाठी 13 कोटी रुपये खर्च केले.
पुल, दोन्ही बाजूचा भराव लक्षात घेता सुमारे 1 किलो मीटर लांब असलेल्या पुलाचे बांधकाम पाच वर्षे सुरू होते. याकाळात पुलास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये दोन्ही बाजूला असलेला भराव कळीचा मुद्दा ठरलेला होता. टाकलेला भराव बंधाऱ्याचेच काम करणार, त्याऐवजी पिलरचा पुल करावा अशी मागणी शेतकऱ्यांची होती. कारण महापूर काळात भरावामुळे पुराचा फुगवटा पश्चिमेकडील पंधरा, सोळा गावांना बसून शेतपिकाचे मोठे नुकसान होणार. तसेच वस्तीत पाणी शिरून अनेक कुटूंब उघड्यावर पडण्याची भीती होती. याचा विचार करीत शेतकऱ्यांनी निवेदने देत आंदोलनेही केली होती. एवढ्यावरच न थांबता उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली.
मात्र होणाऱ्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करीत शासनाने दोन्ही बाजूंना भराव टाकत पुल उभा केला. दीड वर्षापुर्वी त्याचे उद्घाटन होत तो कार्यान्वित झाला. मात्र याकाळात महापूराचे पाणी दोनदा उत्तर बाजूस आलेने पुलावरील वाहतूक बंद ठेवावी लागली. शिवाय पाणी फुगवट्याने शेतीचे नुकसान होत आहे ते वेगळेच. याचा विचार करीत शासनाने भराव हटवत शेतीचे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
वेदगंगा पश्चिम-पुर्व वाहते. नदीच्या दोन्ही बाजूस समांतर असलेले मार्ग सरळ राष्ट्रीय महामार्गाशी जोडले आहेत. असे असतानाही पुल उभारला. परंतु झालेल्या पुलाबद्दल आमची हरकत नाही. मात्र पुल बांधताना शेतकऱ्यांच्या पिकांची काळजी घेतली असती तर बरे झाले असते. किमान पंधरा खेड्यातील शेतीतील पिकांचे नुकसान वाचले असते.
- महादेव पेडणेकर, शेतकरी ( यमगे )
दृष्टीक्षेपात बस्तवडे - आणूर पुल
पुलाची भरावासहित लांबी - अंदाजे 1 किलो मीटर
आणूरकडील भराव - 600 मीटर लांब
बस्तवडेकडील भराव - 250 मीटर लांब
भरावाची उंची - 4 मीटर
खर्च - साधारण 13 कोटी रूपये