नानीबाई चिखली पूरग्रस्त भागातील नागरीकांना स्थलांतराच्या नोटीसा 400 कुटूंबीयांचा समावेश, पूरग्रस्तांच्या मनात धडकी


 नानीबाई चिखली - वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून गावच्या उत्तरेला आलेला महापुर


नानीबाई चिखली 

वेदगंगेचे पाणी पात्राबाहेर पडून नदीकाठी महापूर आलेला आहे. महापुराच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत असून संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका ओळखतच येथील ग्रामपंचायतीने पूरग्रस्त भागातील सुमारे 400 कुटुंबीयांना स्थलांतराच्या नोटीसा पाठविल्या आहेत. दिवसभरात सहा कुटुंब स्थलांतरित होऊन त्यांची मराठी शाळेत ग्रामपंचायतीने व्यवस्था केली आहे. तर 87 जनावरांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. पाणी पातळी अशीच वाढत राहिल्यास आणखी कुटूंब स्थलांतरित होणार असून यामुळे चिखलीकरांच्या मनात धडकी भरली आहे.


वेदगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले की महापुराचा फटका सर्वप्रथम येथील शुक्रवार पेठ, चावडी गल्ली व लोहार कुटुंबीयांना बसतो. यापूर्वी 2005, 2006, 2019 व 2021 साली आलेल्या महापुरात तर भागातील सुमारे 400 कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. पुरात शेकडो घरे पडलेली होती. अनेकांचे संसार पाण्यासोबत वाहून गेले होते. जनावरांचे हाल झाले होते. त्यामुळे वेदगंगा पात्राबाहेर पडली की नदीकाठ धास्तावलेलाच असतो. 


यावर्षीही वेदगंगा पात्राबाहेर पडली आहे. नदीक्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसाने नदीची दिवसेंदिवस पाण्याची पातळी वाढत असून नदीकाठी महापुर आला आहे. महापुराचा अंदाज घेत तसेच पुराचा धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने पुरग्रस्तांची कोणत्याही प्रकारची वित्त हानी होवू नये म्हणून कुटूंबीयांना आपले साहित्य व जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्या संदर्भात नोटीसा दिल्या आहेत. पुराचा अंदाज पाहत काही कुटूंबीयांनी पर्यायी जागेची व्यवस्था करून ठेवली तर काही कुटूंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. दिवसभरात सहा कुटूंबातील 19 व्यक्तिंची व्यवस्था मराठी शाळेत केली आहे. 

पुरग्रस्तांचे घोंगडे अजूनही भिजतच... 

एकीकडे प्रशासन आपले काम प्रामाणिक बजावत असले तरी गेली चार दशके झाले या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनेचा प्रश्न अजूनही रखडलेलाच आहे. प्रत्येक वर्षी महापूर येतो त्यासोबतच पुरग्रस्तांना न चुकता आश्वासन मिळते. मात्र महापूर जसा ओसरतो तशी दिलेली आश्वासने देखील विसरली जातात. किमान यावेळी तरी पुनर्वसनाचा प्रश्न सुटेल का ? असाच प्रश्न पूरग्रस्त करीत आहेत. 



1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक