सामाजिक सलोख्याची दोन शतकांची परंपरा नानीबाई चिखलीतील मोहरम, बारा बलुतेदारांचा समावेश


नानीबाई चिखली येथील संस्थानिक नानीबाई यांचा मसुदीतील मानाचा ताबूत तर दुसऱ्या चित्रात भेटाभेटीचे तख्त.


रमजान कराडे : वेदगंगा वार्ता

नानीबाई चिखली 

करबला येथे झालेल्या युद्धात इमाम हसन, हुसेन यांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या याच पराक्रमाच्या शौर्यगाथा आजही सर्वत्र सांगितल्या जातात. गेली दोन शतके याच शौर्यगाथा ऐकत हिंदू- मुस्लिम सलोख्याची परंपरा जोपासत आलेले संस्थानकालीन गाव म्हणजे नानीबाई चिखली. आज इतक्या वर्षांच्या प्रवासानंतरही येथील समाजातील सामाजिक सलोख्याची वीण मोहरम सणात तर अजूनही घट्ट असलेली पहायला मिळते. 

येथील मोहरममध्ये बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांचा असणारा सहभाग लक्षवेधी असतो. विशेषतः पाटील, गायकवाड, काटकर, चव्हाण, पवार, संकपाळ, कुंभार, कोंगनुळे, लोकरे, लोहार, सुतार, शिरगुप्पे, चौगुले, बुरूड, मगदूम, काईत,आदी कुटूंबीयांचा सहभाग महत्वाचा. यांच्या सहभागातूनच गावात एकूण 18 पंजे, दोन ताबुतांची प्रतिष्ठापना होते. 

पहिल्या दिवशी मानाची कुदळ मसुदीत मुल्लाणींकडून मारली जाते. त्यानंतर चौथ्या दिवशी 4, 5 व्या दिवशी 14 पंजांची तर गैबी दर्गा, मसुदी येथे दोन ताबुतांची प्रतिष्ठापना होते. यापैकी मशिदीत असणारा मानाचा ताबूत संस्थानीक नानीबाई या स्त्रीराज्यकर्त्यांचा असून मुल्लानी कुटुंबाकडे मुजावरकी आहे तर गैबी दर्ग्यामधील ताबूत संस्थानीक वाळवेकर यांचा असून वाडकर कुटूंब मानकरी तर आणुरे कुटूंबीयांकडे मुजावरकी आहे. 

सहाव्या दिवशी चार, सातव्या दिवशी सर्व पीर खेळण्यासाठी उठतात. आठवा दिवस गंधरात्र असतो. या दिवशी गंध चढविण्याचा, खाई पेटविणेचा मान भोसले कुटुंबीयांकडे असतो. यावेळी पोलिस पाटील, गावकरी उपस्थित असतात. 9 व्या दिवशी खत्तलरात्र असते. यारोजी ताबूताचा झेंडा काईत व गावकऱ्यांकडून पुजला जातो. तसेच दिवसभर नवस बोलणे, फेडणे, आंबिल घुगऱ्याचा नैवेद्य आदी कार्यक्रम होतात. रात्रभर मजनू, करबल यांचे ताफे खेळतात. तर जमादार, गायकवाड यांचेकडून रिवायती सादर केल्या जातात. पहाटे तीन वाजता सर्व पंजे बेबी फातीमास भेटण्यास नानीबाई वाड्याजवळ येतात. पहाटे पाच वाजता मानाचा खतम मुल्लाणी देतात. यावेळी भोसले कुटूंबीय उपस्थित राहतात.

खतम झालेनंतर सर्व पंजे बेबी फातिमास भेटाभेटीच्या तख्ताजवळ पळत येत, गळाभेट घेतात. यानंतर संस्थानिक नानीबाईचा ताबूत तख्ताजवळ आणला जातो. यावेळी तख्तावर काईत कुटूंबीयांकडून घोंगडी अंथरून त्यावर ताबूत ठेवत त्यास नैवेद्य दाखविला जातो. दहाव्या दिवशी विसर्जनाच्यावेळी सायंकाळी 6 वाजता पंजे बाहेर पडतात. पंजे खेळत खेळत वेशीबाहेर जात वेदगंगा नदीकाठावर विसर्जित केले जातात. तीन दिवसानंतर जियारत कार्यक्रम होतो. यावेळी आयोजीत केलेला महाप्रसाद भाविक घेतात. यानंतर मोहरमची सांगता होते.

संस्थानिक नानीबाईंने गावात सुरू केला मोहरम

    संस्थानिक असलेल्या नानीबाई यांच्यावर कागल जहागिरीची जबाबदारी 1815 साली पडली. त्यावेळी त्यांनी प्रजाहितदक्ष कारभार करीत गावात जत्रा, यात्रा, सण, उत्सव सर्व समाजातील लोकांना एकत्रित करीत मोठ्या उत्साहात करीत असत. त्याचवेळी मोहरम सणाबद्दल त्यांना माहिती समजली. सणात हिंदू मुस्लिम समाजाचा असलेला सहभाग सामाजिक सलोखा वाढविणारा असल्याचे लक्षात घेत त्यांनी चिखली गावात मोहरम सणास अंदाजे 1820 साली सुरवात केली. आज यास 204 वर्षे होत आहेत. इतक्या वर्षांनंतरही मोहरममधील गावकऱ्यांचा असलेला सहभाग, जपलेला सलोखा नजरेत भरणारा असाच आहे. 

1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक