नानीबाई चिखली
येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जीर्ण, गळकी झाली असून इमारतीला तडे सुध्दा गेले आहेत. इमारतीचे बांधकाम जुन्या पद्धतीचे असल्याने औषधसाठा ठेवण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे पशुंना सेवासुविधा देताना कसरत करावी लागते. यामुळे नुतन इमारतीची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार होत होती. अखेर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दखल घेत इमारतीसाठी 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्याचे रूपडे पालटणार असून आधुनिक सुविधा मिळण्यास मदत मिळणार आहे.
श्रेणी -2 वर्गचा म्हणून ओळखला जाणारा हा दवाखाना नानीबाई चिखली, कौलगे गावांसाठी 1967 साली येथे स्थापन झाला. सुरुवातीला दवाखान्याला स्वतःची इमारत नव्हती.अशावेळी शेतकरी दूध संस्थेने स्वतःच्या इमारतीत दवाखान्यासाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून दिली. सुमारे 25 वर्षे येथूनच दवाखाण्याचे कामकाज होत होते. मात्र नंतरच्या काळात वाढलेल्या पशुधनासाठी पशुवैद्यकीय सेवासुविधा पुरविण्यासाठी इमारतीची गरज लागल्याने तत्कालीन सरपंच रावसाहेब भोसले यांनी वड्डाच्या खणीजवळ 5 गुंठे जागा उपलब्ध करून दिली.
उपलब्ध जागेवर जिल्हा ग्रामीण विकास संस्थेकडून ( डीआरडी ) 1990 - 91 ला अंदाजे चार लाख रुपये खर्च करीत दवाखान्यासाठी स्वतंत्र अशी इमारत बांधली. नंतर जिल्हा परिषद सदस्य संजय मंडलिक यांच्या निधीतून दवाखान्याला संरक्षण भिंत बांधली. गेली 35 वर्षे याच इमारतीतून व्यंधत्व शिबीर, लसीकरण, खच्चीकरण, औषधोपचार, गर्भ तपासणी, शस्त्रक्रिया आदी सेवा पुरविण्यात येत होत्या.
मात्र आता ही इमारत जीर्ण झाली असून भिंतींना तडे गेले आहेत. तसेच इमारतीत गळतीचे प्रमाण देखील वाढले आहे. इमारतीचे बांधकाम जुन्या पध्दतीचे असल्याने पुरेसा औषधसाठा ठेवता येत नाही. यामुळे सेवा सुविधा पुरविताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. यातूनच नवीन इमारतीची मागणी होत होती. अखेर मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, सदाशिव तुकान, सरपंच अल्लाबक्ष सय्यद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दुग्ध क्रांतीचे गाव म्हणून गावची ओळख होत आहे. यामुळे गावात वाढलेल्या पशुधनाला सेवा देताना मोठी अडचण येत होती. यासाठी नवीन इमारतीची गरज लक्षात घेत मंत्री मुश्रीफांकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर यास यश आले.
- अल्लाबक्ष सय्यद, सरपंच नानीबाई चिखली
20 व्या जनगणनेनुसार चिखलीत साधारण 3500 तर कौलगेत 1500 पशुधन आहे. यातून चिखलीतून अंदाजे 5 हजार तर कौलगेतून 2 हजार लिटर दूध संकलन होते. यामुळे वाढत्या पशुधनासाठी वैद्यकीय सुविधा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. अशावेळी आधुनिक पध्दतीने बांधकाम केलेली इमारत गरजेची होती.
![]() |
झाडे, झुडपे, गवत, वेलींनी वाढलेला पशुवैद्यकीय दवाखान्याचा परिसर |