रस्त्याकडील हत्ती गवत देतेय अपघाताला निमंत्रण गावोगावी रस्त्याच्या दुतर्फा लावण, वाहनधारकांकडून नाराजी




नानीबाई चिखली 

खेड्यापाड्यातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाजूपट्टीवर शेतकऱ्यांनी हत्ती गवताची लावण केलेली आहे. मुळात अरूंद असलेले रस्ते उंचच उंच वाढलेल्या हत्ती गवतामुळे धोकादायक बनले आहेत. याबाबत अनेक वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. जनावरांना अधिकचा चारा मिळविण्याच्या लोभापायी शेतकऱ्यांनी वापरलेली ही पध्दत चुकीची असून त्यांनी यातून वेळीच बोध घ्यावा व अपघाताला निमंत्रण देणारे बाजूपट्टीवरील हत्ती गवत हटवावेत अशी मागणी होत आहे. 

कागल तालुका वेदगंगा, दूधगंगा नदीच्या बारमाही वाहण्याने सुजलाम, सुफलाम बनला आहे. यामुळे नदीकाठ असो अगर माळभाग येथील इंच नी इंच जमीन ओलीताखाली आली आहे. यातूनच तालुक्यात ऊस हे मुख्य पिक बनले आहे. ऊस शेतीसोबतच येथे पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. पशु पालनासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिरवा चारा होय. या चाऱ्यासाठी पशुपालक अलिकडे हत्ती गवताची मोठ्या प्रमाणात लावण करीत आहे. 

सुरवातीला शेतकरी याची लावण शेतातील बांधावर करीत होता. मात्र अलीकडे गावात प्रवेश करणारा रस्ता असेल पाणंद, गाडीवाट या प्रत्येक ठिकाणच्या बाजूपट्यांवर याची लावण केली जात आहे. बाजूपट्यांवर याची लावण झालेने ते उंचच उंच वाढते शिवाय त्यास फुटवा जास्त असलेने रस्त्यावर मारलेले पांढरे पट्टे देखील दिसत नाहीत. 

मुळात गावात प्रवेशाचे असलेले रस्ते अरूंद असतात. तशातच हत्ती गवतामुळे हे रस्ते आणखी अरूंद होताना दिसतात. अशा रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनधारकांना समोरील वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे त्यांना मोठी कसरत करावी लागते. एकप्रकारे बाजूपट्टीवरील गवत अपघातांना निमंत्रण देताना दिसतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला अगर बाजूपट्टीवर याची लावण करताना थोडा तरी विचार करावा अशी चर्चा वाहनधारकांतून होत आहे. 

बहूपयोगी हत्ती गवत...

नेपीयर गवत म्हणजेच हत्ती गवत होय. सदरचे गवत बहुवार्षिक असल्याने त्याची एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षापर्यंत त्यातून चारा उत्पादन मिळते. वर्षभरात सात ते आठ कापण्या होतात. हेक्टरी दोन हजार ते अडीच हजार क्विंटल याचे उत्पादन निघते. या चारा पिकाला कोणत्याही प्रकारचा रोग येत नसल्याने तसेच उत्पादन चांगले मिळत असल्याने पशुपालक याची मोठ्या प्रमाणात लावण करतात. यामध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम तसेच जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दुग्धोत्पादनासोबत जनावरांची प्रतिकारशक्ती वाढते. म्हणूनच अशा बहूपयोगी गवताची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करतो. 


रस्त्यावरून प्रवास करीत असताना हत्ती गवतामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. गवतामुळेच चिखलीत दोन, तीन किरकोळ अपघात घडले आहेत.सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी हानी झाली नाही. त्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या या गवताची लावण रस्त्याच्या बाजूपट्यांवर होता कामा नये. 

  - श्रीशैल नुल्ले - सदस्य ग्रामपंचायत चिखली

1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

विभाग

आमचे वाचक