गारगोटीतील 'त्या' हुतात्म्यांची शौर्यगाथा आजही प्रेरणादायी
ऐतिहासिक लढ्याला 82 वर्षे पूर्ण, पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची गरज
रमजान कराडे - वेदगंगा वार्ता नानीबाई चिखली ता. 13
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील गारगोटीचा लढा ऐतिहासिक, स्मृर्तिदायक, उदबोधक आणि रोमहर्षक घटनांनी ओथंबलेला असाच आहे. या लढ्यातील काही प्रसंग काल्पनिक रहस्य कथाहूनही अधिक अदभूत थक्क करणारे आहेत. महात्मा गांधीजींच्या अहिंसात्मक चळवळीचा खरा आदर्श जगाला पटविण्याचे कार्य याच लढ्याने दिले. जिवंत मरण्यापेक्षा मरून जिवंत राहण्याचे दिव्य दर्शन देखील याच लढ्याने घडवून आणले. आज या लढ्याला ८२ वर्षे होत आहेत. मात्र आजही गारगोटीतील 'त्या' हुतात्म्यांची शौर्यगाथा प्रेरणादायी अशीच आहे. आज हुतात्मा दिन. सेनापती कापशी, नानीबाई चिखली, मुरगुड, कलनाकवाडी, खडकलाट, जत्राट भागात हा दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने...
निघालो आम्ही हो सुखाने मराया | स्वतंत्र स्वदेशा प्रयत्न कराया || झालो तुफान करू हासत देहदान | स्वातंत्र्य आणू अथवा मरू हीच आमची शान ||
अशाच प्रकारची प्रतिज्ञा करीत क्रांतीचे सरसेनानी देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार यांच्या प्रेरणेने व सहकार्याने निघालेले करवीरय्या स्वामी, नारायण वारके, मल्लाप्पा चौगुले, शंकरराव इंगळे, तुकाराम भारमल, परशराम साळुंखे, बळवंत जबडे हे वीर. या वीरांनी असामान्य दिव्य करून 13 डिसेंबर 1942 रोजी ऐन तारुण्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. गरीबीत जन्मलेल्या, चैनीपासून लांब राहिलेल्या पण सुसंस्कारित घरात वाढणाऱ्या या वीरांनी यौवनावस्थेत धगधगत्या यज्ञकुंडाला आपलेसे करीत सोन्यासारख्या संसारावर तुळशीपत्र ठेवले. 'करेंगे या मरेंगे' हा एकच मंत्र एकच ध्यास घेत हे वीर दौडले होते.
यावेळी त्यांनी भाई माधवराव बागल, रत्नाप्पाण्णा कुंभार, करवीरय्या स्वामी यांच्या नेतृत्वाखाली धाडसी योजना आखल्या. यामध्ये क्रांतिकार्यासाठी लागणारे द्रव्यबळ अपुरे असल्याने तसेच गारगोटी कचेरीत कैद असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची मुक्तता करून कचेरीवर हल्ला चढवायचा, खजिन्याची लूट करायची, लुटीचा पैसा स्वातंत्र्य चळवळीसाठी वापरायचा, कुर नदीवरील पूल उडवायचा. आदी योजनासाठी 13 डिसेंबर 1942 ही तारीख निश्चित केली.
त्यानुसार गारगोटीतील पाल गुहेत क्रांतीकारक जमा झाले. 15 ते 20 देशभक्तांचा एक गट असे पाच गट पडले. रात्री बाराच्या सुमारास कचेरीला वेढा दिला.पोलीस लाईनला कड्या घातल्या. अत्यंत धाडसाने एकापाठोपाठ एक असे वीर पुढे सरसावले. एवढ्यात एका पोलिसाला चाहूल लागली आणि एकच रणकंदन माजले. रणकंदनात शर्थीची झुंज देणारे करवीरय्या स्वामी बंदुकीच्या गोळीने कोसळले. गोळ्यांच्या आवाजाने बाळू जाधव पोलीसाने खिडकीजवळील जात खिडकीचे काच फोडली व गोळ्या झाडाला सुरुवात केली. यामध्ये शंकर इंगळे, मल्लू चौगुले, बळवंत जबडे, परशराम साळुंखे, नारायण वारके, तुकाराम भरवल या वीर जवानांनी हसत हसलं आपले प्राण भारतमातेस अर्पण केले. गारगोटीची भीषण रंगकंदन संपले. वेदगंगेच्या काठावर वसलेली गारगोटी गावची ही
समरभूमी 42 च्या भारतीय क्रांतीचे स्फर्तीस्थान ठरली. पण...
दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजुनी मेघ मातीचा अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात वेढ्यात मराठे वीर दौडले सात...
लढा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची गरज... इतिहासाच्या पानात हरवलेल्या गारगोटी खजिना लूट क्रांती पर्वाची भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात म्हणावी तितकी दखल घेतले गेली नाही. परिसरातील सात हुतात्म्यांनी बलिदान दिलेल्या १३ डिसेंबर १९४२ रोजीच्या क्रांतिकारक घटनेची इतिहासामध्ये स्वतंत्र नोंद व्हायला हवी होती, पण दुर्दैवाने हा इतिहास दुर्लक्षित झाला आहे. ब्रिटिशांनी त्यांची अवहेलना, विटंबना केलीच. किमान आता तरी या हूतात्म्यांचे कार्य, शौर्य, बलिदान आदी गोष्टी शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून त्यांचा उचित गौरव करणे गरजेचे आहे.