रमजान कराडे - वेदगंगा वार्ता
नानीबाई चिखली
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनें तर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व शाळांमध्ये सन 2023 - 24 मध्ये राबविण्यात आले होते. अभियानाचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर त्याचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे. नवनवीन उपक्रमांसह राबविण्यात येणारा हा टप्पा 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या महिन्याभराच्या कालावधीत पूर्ण होईल. त्यानंतर 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर काळात त्यासाठीची मूल्यांकनाचे प्रक्रिया पूर्ण केली जाईल असा निर्णय शासनाने घेतला आहे.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबर आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे तसेच शैक्षणिक संपादन घटकाच्या वृद्धीस चालना देणे आदी उद्दीष्ट्ये नजरेसमोर ठेवून अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी 29 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत अभियानाची पूर्वतयारी करण्यात येईल. 5 ऑगस्टला औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल.
पहिल्या टप्प्याच्या अभियानास विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास 95 % शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थी अभियानांतर्गत राबविलेल्या उपक्रमात सहभागी झाले होते. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झालेली होती. यासाठी तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिक देण्यात आली होती. विविध प्रकारचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणात साध्य देखील करण्यात आला.
या सर्व बाबी विचारात घेता तसेच पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर सन 2024 - 25 मध्ये देखील 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा - दोन' ही स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्यात येणार आहे. यासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित अन्य सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात आली आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.
अभियानाचा कालावधी -
- अभियानाचा पूर्वतयारी कालावधी - 29 जुलै ते 4 ऑगस्ट
- अभियानाची सुरवात - 5 ऑगस्ट
- अभियानाचा कालावधी - 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर
- मुल्यांकनाची प्रक्रिया - 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर
अभियानाचे स्वरूप
- पायाभूत सुविधा - 33 गुण
- शासन ध्येय धोरण अंमलबजावणी - 74 गुण
- शैक्षणिक संपादणूक - 43 गुण
- एकूण गुण - 150