![]() |
फोटो - नानीबाई चिखली - येथे महापुराचे पाणी ओसरलेनंतर अंगणाची स्वच्छता करताना महिला तर दुसऱ्या चित्रात वर्कशॉपची स्वच्छता करताना |
रमजान कराडे - वेदगंगा वार्ता
नानीबाई चिखली ता. 31
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पात्राबाहेर पडलेली वेदगंगा नदी. नदीकाठावर पुराने घातलेले थैमान. धरणातून पाणी सोडण्यापूर्वीच नागरीकांच्या घरात आलेले पाणी. यावेळी ग्रामस्थांची उडालेली धांदल. वृद्ध व्यक्ती, लहान मुले, जनावरांना सुरक्षित स्थळी हलवित हातात जे सापडेल ते घेत कपड्यांनीशी त्यांनी गाठलेले निवारा केंद्र. केंद्रात झालेली जीवाची घालमेल. अखेर दोन, तीन दिवसापुर्वी पुराचे पाणी ओसरल्यावर पूरग्रस्तांनी धावत गाठलेले घर. यावेळी विस्कटलेला संसार, साचलेला गाळ पाहताना अनेकांचे डोळे पाणावले. याही परिस्थितीत मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा म्हणत पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी घरादाराची स्वच्छता सुरू केलेली पहायला मिळाली.
पावसाळा सुरू झाला. वेदगंगा पात्राबाहेर पडली की त्यांच्या उरात धडकीच भरते. वाढत जाणाऱ्या पाण्यासोबत त्यांची काळजी देखील वाढत जाते. कारण वेदगंगेच्या महापुराचे पाणी सर्वप्रथम येथील शुक्रवार पेठ, चावडी गेली व लोहार कुटुंबीयांच्या घरात प्रवेश करते. यावेळी महापुराच्या काळजीपोटीच घरातील चिमुकली मुले, मुकी जनावरे, वृध्दांना घेतचा त्यांना घराबाहेर पडावे लागते. पुर ओसरेपर्यंत त्यांना निवारा केंद्रात दिवस ढकलावा लागायचा.अशावेळी सर्वांचे हाल होत. मुक्या जनावरांचे तर हाल पाहवत नाही. कारण पाणी आले म्हणून त्यांना सुरक्षित स्थळी हलवता येते, पण शेतवाडीतील चारा हालवता येत नाही.
आठ, दहा दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने कागल तालुक्यातील वेदगंगा नदीला आलेल्या महापुराने थैमान घातले होते. संपूर्ण नदीकाठ पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळाला. याचा नानीबाई चिखलीला मोठा फटका बसला. 2021 च्या महापुरामुळे दिलेल्या जखमातून सावरत असताना यावर्षी पुन्हा एकदा महापुराचा तडाखा बसला. अन् सुमारे 30 कुटुंबातील दीडशे नागरिकांना स्थलांतर करावे लागले. तर 140 जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. या कुटुंबीयांनी घामाच्या पाण्याने अन् श्रमाच्या विटांनी उभा केलेला संसार त्यांच्या डोळ्यात देखत पाण्यात बुडत होता. नदी काठावरील पिकाचे झालेले नुकसान ते वेगळेच
गेली कित्येक वर्षे त्यांचा सुरू असलेला हा पाठशिवनीचा खेळ. या खेळात प्रत्येक वर्षी त्यांचेच नुकसान होते. अलीकडे तर हा महापूर त्यांच्यासाठी नित्याचाच झाला आहे. मात्र प्रत्येक वर्षी महापुरामुळे विस्कटलेला संसार त्यांना पहावा लागतो. सोबत पाण्याने घरादारात मोठ्या प्रमाणात आणलेला गाळ, दरवलेल्या भिंती, कोसळलेले छप्पर, तुटल्या, फुटलेल्या खिडक्या पाहतच मोठ्या कष्टाने त्यांना यास सामोरे जावे लागते. यावेळची परिस्थिती काही वेगळी नव्हती. अशाही परिस्थितीत त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी घरादाराची स्वच्छता करून घेत नव्याने संसाराची घडी बसवायला सुरवात केली.
येथील लोहार गल्ली ही व्यवसाधारक आहे. मात्र गेली कित्येक वर्षे झाले या महापुराचा फटका आम्हाला बसत असल्याने आमच्या व्यवसायामध्ये प्रगती करता आलेली नाही. दुसरीकडे जात व्यवसाय सुरू करायचा म्हटला तरी जागा घेण्यापासून सुरवात करावी लागते. किमान या सर्व गोष्टीचा विचार करीत यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा.
- प्रवीण लोहार ( जग्गू) , पूरग्रस्त नानीबाई चिखली