वेदगंगा वार्ता
![]() |
मेतके - येथे बाळूमामा यांनी रोवलेल्या रणखांबाला अभिषेक करून पूजन करताना ट्रस्टचे अध्यक्ष पापा पाटील कौलवकर यावेळी राजेंद्र पाटील, दयानंद पाटील, बाबासाहेब पाटील |
नानीबाई चिखली ता. 6
चिकोत्रा नदीकाठच्या पुर्वेस असलेले मेतके गाव संत बाळूमामांचे मूळक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील मंदिरात स्वतः सद्गुरू बाळूमामा यांनी १९३२ मध्ये रोवलेला रणखांब श्रावण महिन्याच्या निमित्ताने आजपासून एक महिन्यासाठी भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष पापा पाटील-कौलकर यांच्या हस्ते खांबाची विधीवत पूजन करण्यात आले. खांब पाच सप्टेंबरपर्यंत खुला राहणार आहे.
दरवर्षी श्रावण महिन्यात रणखांब खुला केला जातो. आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अभिषेक आणि पूजनाने रणखांब खुला केला. खांबाबाबत भाविकांमध्ये भक्ती आणि श्रद्धा आहे. आजही येथे येणारे भाविक या खांबाचे दर्शन घेऊन खांबाभोवती फेऱ्या मारतात. २००७ मध्ये या रणखांबाची झीज होऊ नये म्हणून त्यावर पंचधातूचे आवरण चढवले होते. त्यामुळे मूळ खांब पंचधातूच्या आवरणामध्ये झाकल्याने त्याचा भक्तांना थेट स्पर्श होत नाही. आता महिनाभर या मूळ खांबाचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना असणार आहे.
यानिमित्त मंदिरामध्ये सकाळी आरती, संकल्प गणेश पूजन, गंगापूजन, प्रधान देवता पूजन व रणखांबावर अभिषेक झाला. यावेळी राजेंद्र पाटील, दयानंद पाटील, बाबासाहेब पाटील, बळिराम मगर, देवाप्पा पुजारी, एम. के. पाटील, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.