भराव हटाव.... शेती बचाव शेतकऱ्यांचा निर्धार : न्यायालयीन लढाईलाही आर्थिक ताकद
दत्ता पाटील - वेदगंगा वार्ता म्हाकवे ता. 13
![]() |
बस्तवडे - तब्बल 17 दिवस पाण्यात राहिलेल्या नदीकाठच्या ऊसाची झालेली अवस्था |
कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील बस्तवडे, बानगे पुलासह पुणे बेंगलोर महामार्गावरील यमगर्णी पुलाचा भराव हटाव मोहिम अधिक तीव्र करण्याचा निर्धार वेदगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी केला आहे. विकासाला आपला विरोध नाही पण शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये ही भुमिका घेत न्याय हक्कासाठी न्यायालयात धाव घेतलेल्या यमगे येथील शेतकरी महादेव पेडणेकर यांना लोकवर्गणीतून आर्थिक ताकदीसह रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज होण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी केला आहे.
बानगे ( ता. कागल ) येथे वेदगंगा पुर संघर्ष समितीची बैठकीत शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात सर्वच शेतकरी आक्रमक झाले होते. यापुर्वी वेदगंगा नदी पाञाबाहेर पडत होती. मात्र एक दोन दिवसात पुन्हा पाणी पाञात जात. परंतु, गेल्या आठ दहा वर्षांत या नदीवर भराव टाकून पुल बांधल्याने दळणवळणाची सोय झाली. मात्र, नदीकाठावरील शेकडो एकर जमीन पाण्याखाली जात आहे. यंदा तर तब्बल 17 दिवसाहून अधिक काळ पीके पाण्याखाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
यावेळी माजी उपसरपंच रमेश सावंत, भास्कर पाटील ( मळगे ), माजी सरपंच सुनिल घोरपडे ( सोनगे ), एम. एस. भोसले ( बस्तवडे ) यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच सुनील बोगांर्डे, ए. वाय. पाटील - म्हाकवेकर, सरपंच काकासाहेब सावडकर ( आणूर ), राजकुमार पाटील (मळगे), राजेंद्र पाटील ( कौलगे ), पांडुरंग कुंभार ( सोनगे ), दिलीप पाटील ( कुरणी ), सुनील भोळे, अमर पाटील, माजी सरपंच दिलीप चौगुले (भडगाव) यासह शेतकरी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांना भेटणार...
पुलासंदर्भात कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अधिकाऱ्यांना भेटून त्यांना लेखी निवेदन देण्यात येणार आहे. दरवर्षी पुरग्रस्त पिकांना भरपाई देण्याऐवजी शासनाने पिलरचा पुल उभारण्यासाठी अधिक निधी खर्च करावा, अशी माफक अपेक्षाही अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.