साडेसात एचपीवरील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात कृषीपंप वीज माफी : कागलमधील शेतकरी होतायत संघटीत
दत्ता पाटील - वेदगंगा वार्ता म्हाकवे ता. 13
शेतकऱ्यांना कृषी पंपांची वीजबिले माफ करण्याचा निर्णय घेवून शासनाने दिलासा दिला आहे. परंतु, साडेसात एचपीवरील कृषी पंपांची बिले माफ करुन त्यांनाही पाठबळ द्यावे. अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. यासाठी शेतकरी संघटीत होत असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी कर्जे काढून विहीर, नदीवर विद्युत पंप बसविले आहेत. तसेच नदी, विहीरीपासून उंचीवर असणाऱ्या शेतासह डोंगर कपारीला असणाऱ्या शेतीलाही पाणी पोहचविले आहे. यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देशाच्या उत्पादन वाढीसह पर्यावरणालाही हातभार लागला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी करताना साडेसात एचपीची केली होती. मात्र वीज वितरण कंपनीच्या तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांच्या वीजबिलावर 7. 51 किंवा 8 एचपी अशी नोंद झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामध्ये असे शेतकरीही शासनाच्या कृषी पंप वीजबिल माफीच्या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
शासनाने याचा फेरविचार करुन सरसकट सर्वांना वीज माफ करावे अशी मागणीही जोर धरत आहे. यासाठी बानगेचे माजी उपसरपंच रमेश सावंत, माजी सरपंच युवराज पाटील, बाळासाहेब चौगुले, माजी सरपंच सुनील घोरपडे ( सोनगे ), सुनील कदम, माजी सरपंच राजेंद्र पाटील ( कौलगे ), सुयश चौगुले, माजी सरपंच दिलीप चौगुले ( भडगाव ), माजी सरपंच अमित पाटील ( निढोरी ) यांनी पुढाकार घेतला आहे .
बानगेत शुक्रवारी मेळावा
सरसकट वीजबिल माफीच्या मागणीला बळ देण्यासाठी शुक्रवार ( ता. 16 ) रोजी बानगे येथे कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. तसेच, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेही निवेदनाद्वारे पाठपुरावा करणार असल्याचे रमेश सावंत यांनी सांगितले.